उत्तर महाराष्ट्रसह जिल्हा कार्यकारिणीची होणार निवड
जळगाव लाईव्ह न्यूज । पत्रकारांच्या हक्कासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणारी आक्रमक संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’ची महत्त्वपूर्ण बैठक येत्या १ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र व जिल्हाध्यक्षांसह जिल्हास्तरीय नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येणार आहेत.

ही महत्त्वाची बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांची ‘वज्रमुठ’ अधिक मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी या बैठकीचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.

बैठकीचा तपशील खालीलप्रमाणे:
दिनांक: रविवार, १ फेब्रुवारी २०२६
वेळ: दुपारी १ वाजता
स्थळ: पद्मालय शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस), जळगाव.
या बैठकीस केंद्रीय संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, केंद्रीय उपाध्यक्ष रविंद्र पवार, केंद्रीय सचिव भगवान सोनार, केंद्रीय खजिनदार ललित खरे, केंद्रीय सदस्य गणेश पाटील, सुनील चौधरी, जोशीला पगारिया आदी पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पत्रकारिता क्षेत्रातील वाढती आव्हाने आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी संघटना सदैव तत्पर आहे. या बैठकीत केवळ नूतन कार्यकारिणीची निवडच होणार नाही, तर संघटनेच्या भविष्यातील कार्याची दिशाही निश्चित केली जाणार आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजूट दाखवावी, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.



