जळगाव लाईव्ह न्यूज | १० ऑगस्ट २०२३ | शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांची अलीकडेच पत्रकार संदीप महाजन (Sandip Mahajan) यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल (Audio clip)झाली होती. त्यात आमदाराने पत्रकाराला मारहाण करण्याची धमकी दिली होती. आता संबंधित पत्रकाराला भर रस्त्यात मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) व ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटासह आमदार किशोर पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
रिपोर्टींग करुन घरी जात असताना महाजन यांना काही जणांनी अडवून त्यांना जबर मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. तर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे लोक अशी मारहाण करत आहेत हे दुर्दैवी असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सत्तेची नशा अशी असते का? : रोहित पवार
महाजन यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची .का ? तर त्याने विरोधात बातमी छापली. विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे. ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल.
त्याचशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना, स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे. सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे, परंतु एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे अशी नाराजीही रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.
पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची,मारण्याची धमकी द्यायची,दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची ..का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून….
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 10, 2023
विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले… pic.twitter.com/cjMxWbT1y3
हे कायद्याचं राज्य आहे का? : संजय राऊत
जळगावच्या पाचोऱ्यात एका पत्रकारावर हल्ला होतो. तो हल्ला शिंदे गटाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याचे व्हिडिओ समोर आलेत. तर हे कायद्याचं राज्य आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे लोक अशी मारहाण करत आहेत हे दुर्दैवी असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
काय आहे प्रकरण?
जळगाव जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरण समोर आलं. या प्रकरणावरुन पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आमदार किशोर पाटील यांनी टीकेवरुन पत्रकाराला शिवीगाळ केली. यासंदर्भात ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांना ऑडिओ क्लीपबद्दल प्रश्न विचारला. त्यावर, त्यांनी होय ती ऑडिओ क्लीप माझीच आहे, मीच पत्रकाराला शिवीगाळ केलीय, असा खुलासाही त्यांनी केला होता.