Jamner : मंत्री महाजनांना मतदारसंघातील तरुणांनी घेरलं, चिखलाच्या रस्त्यातून जाण्यास भाग पाडले, VIDEO व्हायरल
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२४ । राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात अतिशय गलिच्छ रस्ते पाहायला मिळाले आहेत. मंत्री महाजन हे लिहा तांडा गावात गेले असता त्या ठिकाणी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत त्या ठिकाणी असलेल्या काही तरुणांनी रोष व्यक्त केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय.
“ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना तरुणांनी विचारला जाब…. जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे भंडाऱ्यानिमित्त गिरीश महाजन आले असता गेल्या 30 वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुरावस्था का ? असे विचारले असता मंत्री महोदयांनी ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तर न देता तेथून पळ काढला… जामनेर तालुक्यात एकच चर्चा.” असे कॅप्शन देऊन अंबादास दानवे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
काल १३ सप्टेंबर रोजी रामदेव बाबा यात्रोत्सवा निमित्त मंत्री महाजन हे लिहे तांडा येथे आले असता तरुणांनी त्यांना त्या रस्त्यातून प्रवास करण्यास भाग पाडले. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गिरीश महाजन हे मोटार सायकलवर बसून अत्यंत खराब अवस्थेत असलेल्या रस्त्यावरून जात आहेत. तर स्थानिक तरुण त्यांना हाका मारताना दिसत आहेत.
राज्यात जेव्हा संकट येते अथवा राजकीय परिस्थितीतून मार्ग काढायचा असतो तेव्हा मंत्री गिरीश महाजन यांची निवड केली जाते. यामुळेच त्यांना संकटमोचक म्हणून संबोधले जाते. आता याच संकट मोचक महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील रस्त्यांचे संकट कोण निवारणार? हा देखील मोठा प्रश्न जनतेला पडलेला आहे.