जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानच्या १५० वर्षांची अखंड परंपरा असलेला श्रीराम रथोत्सव गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कार्तिकी प्रबोधिनी एकादशी निमीत्त साजरा होणारा हा राज्यातील एकमेव श्रीराम रथोत्सव आहे. कोरोना आणि आर्थिक मंदीची झळ कमी झाल्याने यंदाचा श्रीराम रथोत्सव जल्लोषात साजरा होणार यात तिळमात्र शंका नाही. दोन दिवसापूर्वीच रथाची स्वच्छता करून रथ धुण्यात आला. वहनोत्सवाला अगोदरच सुरुवात झाली असून रथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रासक्रीडा वहनाने उत्सवाचा समारोप होत असतो. दीडशतकी परंपरा लाभलेल्या श्रीराम रथोस्तवाची सुरुवात आणि आजपर्यंतचा प्रवास देखील अत्यंत रोचक आणि उत्कंठावर्धक आहे.
जळगावच्या जुन्या गावातील रामपेठेतील प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर हे ग्रामदैवत मानले जाते. श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिकी शुद्ध प्रतिपदेपासून वहनोत्सव साजरा होत असतो. जलग्राम प्रदक्षिणा घालताना गावात ठिकठिकाणी भजन- भारूड, पानसुपारीचा कार्यक्रम होतो. वहनावर विविध प्राणिमात्रांसह देवी-देवतांच्या मूर्ती असतात. भारतीय संस्कृती मानवाबरोबरच प्राणिमात्रांचेही ऋण मानते. त्याचेच प्रतीक म्हणजे हा वहनोत्सव मानला जात आहे. यात घोडा, हत्ती, सिंह, मोर, शेषनाग, सरस्वती, चंद्र, सूर्य, गरुड, मारुती अशी दहा दिवस वहने निघतात. कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला रथोत्सव साजरा झाल्यानंतर कार्तिकी शुद्ध त्रिपुरारी पौर्णिमेला उत्सवाचा समारोप होतो. यामुळे जळगावनगरीत पंधरा दिवसांचा दीपोत्सव व आनंदोत्सव साजरा होत असतो.
अशी सुरू झाली परंपरा
श्रीराम मंदिर संस्थानचे प्रथम गादिपती मूळ सत्पुरुष श्री आप्पा महाराज हे मेहरूण तलावाजवळ ध्यानस्थ बसलेले असताना, त्यांना त्या अवस्थेत साक्षात मुक्ताबाईचा (संत शिरोमणी) साक्षात्कार झाला. त्यांनी दृष्टान्त देऊन वहन व रथोत्सवाची प्रेरणा आप्पा महाराजांना दिली. त्या वर्षापासून म्हणजे इसवी सन १८७२ पासून आजतागायत १४९ वर्षांची परंपरा जोपासत जळगावचा हा रथोत्सव अद्ययावतपणे सुरू आहे. कार्तिकी शुद्ध एकादशीला रथाची गाव परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर रात्री सवाद्य रथावरील देव उतरवून पुनश्च मंदिरात नेले जातात. कार्तिकी शुद्ध द्वादशीला शेवटचे वहन म्हणून कृष्णाची रासक्रीडा असते. गोप-गोपिकांच्या मूर्ती वहनावर सजविल्या जातात. वहनाला ठिकठिकाणी ‘पानसुपारी’ असते. ‘पानसुपारी’ म्हणजे यजमानपद. त्या दिवशी देव आपल्या घरी पाहुणे म्हणून येतात. त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. देवांच्या वतीने मंदिराचे महाराज तो सन्मान स्वीकारतात. भजन- भारुड होऊन “पानसुपारी’ची सांगता होते. जळगावच्या रथोत्सवासाठी शहर व परिसरच नव्हे; तर जिल्हाभरातील खेड्यापाड्यांतूनही लोक दर्शनासाठी येतात. दिवाळीसाठी जळगावच्या माहेरवाशिणी रथोत्सवानंतरच सासरी जातात.
हिंदू- मुस्लिम एकोप्याचे दर्शन
श्रीराम रथोत्सवात हिंदू- मुस्लिम समाजबांधवांचे एकोप्याचे दर्शन लाभते. कारण, श्रीराम रथ परिक्रमा करीत असताना संत लालखॉं मियॉं यांच्या समाधीजवळ येतो व थोडा वेळ थांबतो. कारण, श्री संत आप्पा महाराज व लालखॉं मियॉं यांचा स्नेहभाव खूप जवळचा होता आणि तो खानदेशात परिचितदेखील आहे. संत लालखॉं मियॉं यांच्या समाधीवर रथोत्सव समितीतर्फे पुष्पचादर अर्पण केली जात असते; तर मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने रथोत्सवातील मान्यवरांचा सत्कार केला जातो. गेल्या अनेकवर्षापासून हि परंपरा कायम असून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील त्याठिकाणी उपस्थित असतात. हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन रथोत्सवानिमित्त सर्वांना पाहायला मिळते.
शहर विस्तारले, उत्सवाचा मार्ग विस्तारला
1872 मध्ये रथोत्सव सुरू झाल्यानंतर सुरवातीच्या काळात रथोत्सवाचे स्वरूप वेगळे होते. त्या काळात मातीच्या रस्त्यावरून रथ उत्साहाने ओढला जात होता. विरेषेत म्हणजे तेव्हा आज दिसत असलेले जळगाव शहर नव्हते तर केवळ जुने जळगाव परिसराच होता. तेव्हा रथोत्सवाला रात्री मशाल, पणत्या लावल्या जात होत्या. साधारण शंभर वर्षांपूर्वी जुन्या गावातच रथ फिरत असल्याने मार्गही लहान होता. यामुळे दुपारी बाराला निघालेला रथ सायंकाळी सहापर्यंत मंदिरात परत येत होता. म्हणजे सहा तासांचा हा उत्सव होता. जसजसा काळ बदलला, शहर विस्तारले तसा रथोत्सवातील उत्साह बदलला, रूप बदलले आणि मार्गही बदलला. यामुळे सहा तासांचा असलेला उत्सव बारा तासांचा झाला आहे.
असा आहे रथोत्सवाचा मार्ग
दुपारी ग्रामदैवत श्रीराम मंदिरात रथावर प्रभू श्रीरामांच्या उत्सव मूर्तींची स्थापना केल्यावर मान्यवरांच्या हस्ते महाआरती केली जाते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास रथ ओढण्यास श्रीराम मंदिराकडून सुरुवात होते. त्यानंतर भोईटे गढी, कोल्हे वाडा, आंबेडकर नगर, चौधरी वाडा, तेली चौक, राम मारुती पेठ, श्रीराम मंदिर मागील गल्ली, रथ चौक, श्री भैरवनाथ मंदिर, बोहरा बाजार, सुभाष चौक, दाणा बाजार, पीपल्स बँक मार्गे शिवाजी रस्ता, घाणेकर चौक, गांधी मार्केट, सुभाष चौक, श्री भवानी मंदिर, मरी माता मंदिर, श्री लालशा बाबा समाधी भिलपुरा, बालाजी मंदिर मार्गे रथ आपल्या मुख्य घराजवळ म्हणजे रथचौकात पोहचतो. चौकात रथ येऊन प्रभू रामरायांची उत्सवमूर्ती पालखीत विराजित होऊन श्रीराम मंदिरात रामनामघोषात आणून विराजित केली जाते. त्यानंतर रथ आपल्या घरात लावण्यात येतो.
श्रीराम मंदिराचे गादिपती
प्रथम : श्री संत सद्गुरू आप्पा महाराज (1872 ते 1910)
द्वितीय : श्री सद्गुरू वासुदेव महाराज (1910 ते 1937)
तृतीय : श्री सद्गुरू केशव महाराज (1937 ते 1975)
चतुर्थ : श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराज (1975 ते 2002)
पाचवे : विद्यमान हरिभक्त परायण श्री मंगेश महाराज