जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना वाढल्या असून अनेकांना यात जीवावर मुकावे लागत आहे. अशात यावल तालुक्यातील पाडळसे गावाजवळ भुसावळ-फैजपूर रोडवर बुलेट आणि एसटी बसचा अपघात झाला.

यामध्ये ३० वर्षीय तरुण हा जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मयूर श्रीराम गवळी (वय ३२, रा. इंद्रप्रस्थनगर, जळगाव) असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून जखमींना तातडीने प्रारंभी भुसावळ येथील ट्रामा सेंटर व नंतर जिल्हा रुग्णालयात हलवले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

या घटनेबाबत असे की मयूर गवळी, जयेश सुधाकर पाटील (वय २९) आणि चिरिया मनोज गोहर (वय २९, सर्वजण फैजपूरहून जळगावकडे मोटारसायकल क्रमांक एमएच १९ ईएफ ७७०४ ने प्रवास करत होते. दरम्यान, पाडळसे गावाजवळ एस.टी. बस (क्रमांक एमएच १४ एमएच १०८३) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना भुसावळ येथील उपजिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयूर गवळी यांना तपासणीनंतर मृत घोषित केले. इतर दोघांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी जळगाव सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले.या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मयूरच्या निधनाने जळगाव हळहळले
मयूर गवळी हे जळगावात ‘महाबासुंदी’ चहा विक्रेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा मनमिळाऊ, हसतमुख स्वभाव आणि मदत करण्याची वृत्ती यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच अनेक नातेवाईक, मित्र आणि परिचितांनी घटनास्थळी गर्दी केली. मयूर यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी आणि तीन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जळगाव शहरात शोककळा पसरली आहे.





