जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२४ । सध्या उन्हाचा पारा वाढल्याने जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणावर उकाडा वाढला आहे. असह्य उकाड्यामुळे जळगावकर होरपळून निघत असून यातच येत्या शनिवारी (४ मे) जिल्ह्याचे तापमान ४४ अंशांपुढे जाणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून पारा ४३ अंशांच्च्या पुढेच आहे.
यंदा जरी उशिराने उन्हाळ्याला सुरुवात झाली असली तरी एप्रिल महिन्यात मात्र सूर्यदेव चांगलेच तापले आहेत. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत पारा चाळिशीपर्यंत पोहोचला होता. मात्र, एप्रिल महिन्यात पारा ४० अंशाच्या खालीच जात नसल्याचे चित्र आहे. एक-दोन दिवस वगळता एप्रिल महिन्यात पारा ४१ अंशाच्या पुढेच राहिला आहे. दिवसा तर उष्ण झळा कायम असतातच, मात्र रात्री उशिरापर्यंत उकाडा जाणवत असल्याने, आता दिवसासोबतच रात्रदेखील ‘हॉट’ ठरली आहे.
गेल्यावर्षी उन्हाळ्यातील मार्च व एप्रिल हे दोन महिने मिळून तब्बल ४६ दिवस ढगाळ वातावरण कायम होते. त्यात काही दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे उन्हाळा असूनही पारा ३७ ते ३९ अंशापर्यंत राहिला होता. त्यामुळे अनेक वर्षानंतर २०२३ या वर्षाचा उन्हाळा थंड ठरला होता. यंदाचा उन्हाळा चांगलाच तापला आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी तापमान ४३.४ अंशांवर होते. आज मंगळवारी देखील पारा तेवढाच तापणार आहे. दरम्यान, दिवसासह रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा उष्ण झळा, तर रात्री उकाड्यामुळे तगमग अशी स्थिती आहे. रात्रीचा पारा देखील २७ ते २८ अंशावर राहत आहे. विशेष म्हणजे रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत उष्ण झळा कायम असतात.
यातच मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील अनेक शहरांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात देखील ४ मे पासून उष्णता अधिक जाणवणार आहे. ४ मे जिल्ह्याचे तापमान ४४ अंशांपुढे जाणार असल्याचा अंदाज आहे. या काळात दुपारच्या वेळेस घराबाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली ठेवा, डोक्यावर रूमाल बांधा असा सल्ला येथील जीएमसीच्या डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.