जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात थंडीची लाट काहीशी कमी झाली असली, तरी हुडहुडी कायम आहे. जळगावसह राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू असून सलग चौथ्या दिवशी जळगाव जिल्यात किमान तापमानात किंचित वाढ नोंदवण्यात आली.बुधवारी पहाटे किमान तापमान ९.७ तर दुपारी कमाल तापमान २८.९ अंशांवर आले आहे.

जळगावात मागच्या पाच दिवसापूर्वी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती. २० डिसेंबरला जळगावचे किमान तापमान ६ अंशापर्यंत घसरले होते. यामुळे जळगावकर गारठले होते. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीपासून किमान तापमानात वाढ होताना दिसत आहे.

गेल्या आठवड्यात वाढत्या थंडीत गारठलेल्या जळगावकरांना आता निसर्गाकडून दिलासा मिळताना दिसतो आहे. जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी किमान तापमानात किंचित वाढ नोंदवण्यात आली. बुधवारी पहाटे किमान तापमान ९.७ तर दुपारी कमाल तापमान २८.९ अंशांवर आले आहे. तापमानात वाढ झाली असली तरी सकाळी आणि रात्रीच्या वेळेस थंडीचा कडाका कायम आहे. मात्र दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका बसत आहे.

आता पुढे काय?
आता येत्या दोन-तीन दिवसांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा थंडीची नवीन लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.





