जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२५ । उत्तरेकडून ताशी १० ते १२ किलोमीटर वेगाने येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे दोन दिवसांपूर्वी शहराचा पारा ६ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवले होते. रेकॉर्डब्रेक थंडीनंतर गेल्या दिवसापासून किमान तापमान ९ अंशावर स्थिरावले असून यामुळे थंडी काहीशी कमी झाल्याने जळगावकरांना दिलासा मिळाला.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आगामी काळात रात्रीच्या तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होऊ शकते, मात्र थंड वाऱ्यांचा वेग आणि वातावरणातील गारठा तसाच राहणार आहे. सकाळी वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने दाट धुके पडण्याची शक्यता आहे. यासह ताशी १५ ते २० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

कडाक्याची थंडी जरी सामान्यांसाठी हुडहुडी भरवणारी असली, तरी शेतकऱ्यांसाठी ती वरदान ठरत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे गहू आणि हरभरा या पिकांची वाढ अत्यंत चांगली होत आहे. गेल्या काही वर्षात ऐन थंडीत ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकांचे नुकसान होत असे. मात्र, यंदा वातावरण स्वच्छ आणि थंड असल्याने पिकांवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही.






