जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२६ । जळगाव राज्याच्या हवामान चढ-उतार पाहायला मिळत असून मागच्या काही दिवसांपासून थंडीचा जोर काहीसा कमी झाल्याचे जाणवत असले तरी, सकाळी व रात्रीच्या वेळेत गारवा कायम आहे. दरम्यान, जळगावमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

राज्यातील काही ठिकाणी पुढील २ दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठावड्यातील काही भागात ढगाळ हवामानसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील तीन दिवस ढगाळ हवामानाचा अंदाज आहे. तर गुरुवारी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचाही अंदाज देण्यात आला. ढगाळ हवामानामुळे राज्यातील थंडीचा कडाका कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

जळगावात मंगळवारी तापमान स्थिर दिसून आले. काल जळगावचे किमान तापमान ११.६ तर कमाल तापमान २८. ६ अंश इतके होते. दरम्यान. आज बुधवार ते रविवारपर्यंत किमान तापमान १२ ते १६ अंश आणि कमाल तापमान ३० ते ३१ अंशावर राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाची प्रणाली आहे. जी दक्षिणेकडून आर्द्र हवा आणते व ढगाळ वातावरण तयार करते. ही स्थिती पाहता २३ तारखेपासून पुन्हा धुके वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासक यांनी वर्तविली आहे.
दरम्यान आज बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण जळगाव शहरासह जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. सकाळपासून सूर्य दर्शन झाले नाहीय. ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे.हवामान खात्यानं जळगावात हलक्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.



