जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२६ । जळगावसह महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होताना दिसत आहे. कधी ढगाळ वातावरण, तर कधी थंडी तर मध्येच उकाडा अशी स्थिती आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी असली तरी राज्यात म्हणावा तेवढा गारठा नक्कीच नाहीये. राज्यातील तापमानात चढ-उतार कायम असून सोमवारी जळगावच्या तापमानात घसरण दिसून आली. ज्यामुळे वातावरणात गारठा वाढला आहे आणि रात्रीच्या वेळी थंडी जाणवत आहे
रविवारी जळगावचे किमान तापमान १२.६ अंश तर कमाल तापमान ३०.५ अंश सेल्सिअस इतके होते. सोमवारी यात घसरण झाली. काल रात्रीचे किमान तापमान ११. ८ अंश तर दिवसाचा पारा २८.४ अंश इतके होते. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अमुलाग्र बदल झाला आहे. दुपारच्या सुमारास उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत, तर सायंकाळी आणि सकाळी गारठा निर्माण होत आहे.

राज्यातील स्थिती?
दरम्यान, उत्तर पश्चिमेकडून म्हणजे पाकिस्तानसह लगतच्या देशाकडून भारताकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यामुळे उत्तर भारतासह महाराष्ट्र पुन्हा गारठला आहे. पुढील २४ तास हा गारठा कायम राहणार असून, त्यानंतर मात्र तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामान विभागानुसार, सोमवारी निफाड येथे ७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदिया येथे ९.८ अंश सेल्सिअस आणि धुळे येथे १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.




