जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून थंडीचा जोर ओसरला असून रात्रीचा तापमानाचा पारा १० ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावला आहे. मात्र, जळगावकरांना पुन्हा थंडीची हुडहुडी जाणवणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी २४ जानेवारीपर्यंत तापमानात मोठी घट होण्याची शक्यता कमी असून, थंडीचे प्रमाण मध्यमच राहणार आहे. मात्र, २६ जानेवारीनंतर पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा जोर वाढला होता, मात्र त्यानंतर काही दिवसांत अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. रात्रीचा पारा १० ते १४ अंशांपर्यत गेल्याने रात्री जाणवणारा गारवा काहीसा कमी झाला आहे. किमान तापमानासोबतच दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली. रविवारी जळगावचे किमान तापमान १२.६ अंश तर कमाल तापमान ३०.५ अंश सेल्सिअस इतके होते. दिवसा उन्हाचा चटका वाढला आहे.

सध्या उत्तरेकडून येणारे थंड वारे कमकुवत झाल्याने आणि पूर्वेकडून उबदार हवा येत असल्याने थंडी कमी जाणवत आहे. थंडीचा जोर ओसरलेला असला तरी येत्या आठवड्याच्या शेवटी थंडीची तीव्रता पुन्हा वाढणार आहे. आगामी चार ते पाच दिवस हे तापमान १० ते १३ अंशांच्या दरम्यान स्थिर राहील, असा अंदाज आहे. तर कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहणार आहे. त्यामुळे दिवस उबदार राहतील.२४ तारखेपर्यंत थंडीचा फारसा प्रभाव जाणवणार नसला तरी, उत्तरेकडील वारे पुन्हा सक्रिय झाल्यास २६ जानेवारीपासून जिल्ह्याला पुन्हा हुडहुडी भरू शकते.



