जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२५ । महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. तर अद्यापही काही ठिकाणी मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. यानंतर पुढचे चार दिवस जिल्ह्यात हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. मात्र गेल्या आठवड्यात पावसाने कमबॅक केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मागच्या दोन तीन दिवसात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. काल रविवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या संततधार पावसामुळे २७ जुलैला जळगावकरांना सूर्यदर्शन झाले नाही. अधूनमधून विश्रांती, तर कधी जोरदार शिडकावा अशा प्रकाराने पावसाने दिवसभर पाठशिवणीचा खेळ खेळला.

ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. मात्र, सततच्या पावसामुळे रस्त्यांवर चिखलच चिखल झालेला होता. अनेक ठिकाणी खड्यांमध्ये पाणी साचले होते, ज्यामुळे नागरिकांना पायी जाताना व वाहने चालविताना अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) २८ ते ३१ जुलै दरम्यान हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर १ व २ ऑगस्टला ढगाळ वातावरणासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

तापमान घसरणार
दरम्यान गेल्या काही दिवसापूर्वी पावसाने पाठ फिरविल्याने वाढलेला तापमानाचा पारा ३५ अंशापर्यंत गेला. यामुळे यामुळे जळगावकर उकाड्याने हैराण झाला होता. मात्र पावसाने आता ढगाळ वातावरणामुळे तापमान घसरले आहे. रविवारी जळगावचे तापमान २९ अंश इतके होते. तर जिल्ह्यात आगामी चार दिवस हलक्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन तापमान २५ ते २८ अंशांवर राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.





