जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२४ । सध्या राज्यातील किमान तापमानामध्ये घट होत असून सगळीकडे थंडी हळूहळू वाढत आहे. यातच उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे जळगाव शहरासह जिल्हा २८ नोव्हेंबरपर्यंत चांगलाच गारठणार आहे. या काळात किमान तापमान ११ अंशांवर घसरण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे मात्र डिसेंबरमध्ये जळगावकरांना तापमानात चढ-उतार दिसेल. सुरुवातीच्या आठवड्यात अवकाळीची शक्यताही हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे पाणीसाठा मुबलक आहे. त्यामुळे जोरदार थंडीचे संकेत आधीच मिळाले. यंदा दिवाळीपासूनच थंडीची चाहूल लागली आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे गारठा वाढला आहे. रविवारी कमाल तापमान ३० अंश तर किमान १३.१ अंशांवर होते. दिवसा उन्हाचा चटका तर सायंकाळी ७ वाजेपासून थंडीचा जोर वाढून सकाळी ९ पर्यंत जाणवत आहे. थंड वाऱ्याचा वेग वाढल्याने पुढील दोन दिवस किमान तापमान ११ अंशांवर जाण्याची शक्यता आहे असे हवामान अभ्यासक यांनी सांगितले. गारठा वाढणार असल्याने घराबाहेर पडताना सोबत स्वेटर बाळगा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
तुरळक पावसाची शक्यता
डिसेंबरात ३ आणि ४ रोजी जळगाव शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी विशेषतः दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे म्हणजेच पश्चिम विक्षोपामुळे पावसाची शक्यता आहे. हरभरा, गहू आणि कांद्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे.