जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२५ । उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह तीव्र होताच जळगावसह महाराष्ट्रामधील तापमानात कमालीची घट झाल्यामुळे गारठा वाढला आहे. बुधवारी जळगावचे किमान तापमान ८.२ अंशांवर घसरल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान आगामी दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज असून मात्र याच दरम्यान राज्यात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान खात्याने आहे. Weather Update Today
गेल्या काही दिवसापासून राज्यातील तापमानात चढ-उतार दिसून येत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तापमान ११ अंशावर होते. त्यात आता उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे जळगावसह राज्यातील तापमानात घट झाली आहे. जळगावात ७ जानेवारीला किमान तापमान ८.८ होते. त्यात काल ८ रोजी ८.२ अंशांपर्यंत घसरले.
आगामी दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार असून, तापमान ८ ते १० अंशांवर तर कमाल तापमान २८ ते ३२० अंशांच्या दरम्यान राहणार आहे. तर १० ते १२ जानेवारीदरम्यान किमान तापमान १२ अंशांच्या दरम्यान राहणार असल्याचे हवामान अभ्यासक यांनी सांगितले. सध्या जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट पसरल्यामुळे पुन्हा गारठा वाढला. सकाळच्या सुमारास थंडीचा तडाखा पाहायला मिळत आहे. पहाटेच्या सुमारास थंडीपासून वाचण्यासाठी नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.
राज्यात कसं राहणार तापमान?
दरम्यान हवामान खात्याने आज राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. राज्यात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यातच उद्यापासून राज्यात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.