जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२४ । सध्या तापमानात सतत बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी तापमानात घट झाल्याने थंडीच्या कडाक्याने जळगाव गारठले होते. मात्र आता किमान तापमानात गेल्या तीन दिवसांत चार अंशांनी वाढ झाल्याने थंडीचा गारठा गायब झाला आहे. रविवारी जळगावचे किमान तापमान १३.९ अंशांवर तर कमाल तापमान ३३ अंशांवर पोहोचले. यामुळे दुपारच्या वेळेस उन्हाच्या झळा जाणवल्या.
गेल्या काही दिवसापूर्वी जळगावातील तापमानाचा पारा ९ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत होता. यामुळे जळगावकरांना थंडीचा कडाका जाणवला. मात्र आता तापमानात वाढ झाल्याने थंडीचा गारठा हरवला आहे. दरम्यान, आज सोमवार व उद्या मंगळवारी तापमान ३३ अंशांच्या पुढे राहणार असल्याचा अंदाज आहे. एकंदरीत उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याचे हे संकेत आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात तापमान वाढ होईल, मार्चपासून उन्हाच्या झळा बसतील, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.
तसेच पुढील पाच दिवसांत तापमान पुन्हा १० ते १२ अंशांवर येऊ शकते. तसेच सध्या बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने जळगावसह खान्देशात अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिना हा उन्हाळा येण्यापूर्वीचा काळ आहे. सध्या हवामानात स्ट्रॉग अल निनो स्थिती आहे. त्यामुळे मार्च ते मे असे तीन महिने प्रखर तापमान वाढीचे असतील, या वर्मी ३ ते ४ वेळा उष्ण लहरी येण्याची शक्यता आहे. २०२४ हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष राहणार आहे. जागतिक सरासरी तापमान हे १.५च्या आसपास किंवा अधिक पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली आहे.