जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२४ । गेल्या काही दिवसापासून जळगावसह राज्यातील ठिकाणी किमान आणि कमाल तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. जळगाव जिल्ह्यातील पारा ७ ते ८ अंशादरम्यान राहिला आहे. यामुळे हुडहुडी भरणारी थंडी जळगावकरांना जाणवत असून आगामी एक ते दोन दिवस जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम राहील. मात्र, त्यानंतर काही दिवस थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे जळगावसह राज्यभरातून थंडी गायब झाली होती. फेंगल वादळाचा जोर कमी झाल्यानंतर मात्र जळगाव जिल्ह्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे.
थंडीचा जोर कमी होणार
गेल्या आठवडाभरापासून थंडीचा जोर वाढला असला तरी, हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी दोन दिवसांनंतर, विशेषत: २० डिसेंबरनंतर जिल्ह्यात थंडीचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज आहे. काही प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण होऊन, रात्रीचा पारा १२ ते १३ अंश सेल्सियसवर येऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.
तापमानाची नोंद
गेल्या काही दिवसांच्या तापमानाच्या नोंदी पुढीलप्रमाणे आहेत:
१७ डिसेंबर: ८.४ अंश
१६ डिसेंबर: ८.२ अंश
१५ डिसेंबर: ७.६ अंश
१४ डिसेंबर: ७.८ अंश
१३ डिसेंबर: ८.४ अंश
१२ डिसेंबर: ९.५ अंश
शेतकऱ्यांना फायदा
कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी हंगामातील गहू व हरभऱ्याला फायदा होत आहे. रात्रीच्या वेळेस ओस पडत असल्याने कोरडवाहू शेतीवरील पिकांना फायदा होत आहे. गहू व हरभऱ्याच्या वाढीस फायदा होत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे मात्र जनावरांचे हाल होत असल्याचे चित्र आहे.