जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२४ । गेल्या तीन चार दिवसापासून महाराष्ट्राचा पारा कमालीचा घसरलाय. अनेक ठिकाणाचे कमाल आणि किमान तापमान घसरल्याने जम्मू काश्मीर, सारख्या थंडीचा अनुभव राज्यातील नागरिकांना येत आहे. दरम्यान सलग तिसऱ्या दिवशी जळगाव जिल्ह्यात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. पुढील तीन दिवस तापमान आणखी घसरण्याचा अंदाज आहे.
जळगावात चार दिवसांपासून तापमान १० अंशाखाली असून मंगळवारी ८.४ अंशाची नोंद करण्यात आली. पश्चिमी चक्रवातामुळे काश्मीरसह हिमाचल प्रदेश व उत्तराखंडात हिमवृष्टी होत असून तिकडून ताशी १५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात कोकण वगळता बहुतेक शहरांत थंडीची लाट आली आहे.
जळगाव जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने घट होत असून पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. या थंडीच्या लाटेमुळे वृद्ध व मुलांमध्ये कपाचे आजार वाढले असून थंडी वाढत असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. ग्रामीण भागात तर हवेमुळे थंडीचा कडाका आणखीनच जोर पकडत आहे. दरम्यान थंडीचा फायदा रब्बीतील पिकांना मिळणार आहे.