जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारातून चोरट्यांनी चक्क मोबाईल टॉवरवरील फाईव्ह जीचे मॉडेल चोरून पुणे येथे विक्री केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहेत प्रकार?
जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिराजवळ रविंद्र अरविंद पाटील (वय ४५) हे राहत असून खासगी नोकरी करतात. दि. १ ऑगस्ट रोजी जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारातील मोबाईल टॉवरवरुन मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तर २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एका खासगी मोबाईल कंपनीच्या टॉवरवर लावलेले दोन मॉडेल चोरीस गेले होते.
याप्रकरणी संशयित परवेज उर्फ बबलू महेमुद पिंजारी (वय २९, रा. खंडेराव नगर, पिंप्राळा) व समीर शेख शाकीर शेख (वय २४, रा. आझादनगर, पिंप्राळा हुडको) यांनी चोरुन नेल्याचे पोलीस तपासात उघड झाले. ते मॉडेल या चोरट्यांनी पुणे येथील पिसोळी येथील रिजवान निसार अहमद अली (वय ३२) याला विक्री केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद बागल हे करीत आहे.