जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२४ । राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झालेला पाहायला मिळतोय. साधारणतः मार्च महिन्यापासून उन्हाळा सुरू होतो, मात्र, बंदा बर्फवृष्टी, पाऊस आणि गारपिटीमुळे पूर्ण हवामान बदलले आहे. काही दिवसापूर्वी जळगावचे तापमान ३७ अंशावर गेल्याने उन्हाची चाहूल लागली होती. मात्र गेल्या काही दिवसापूर्वी जळगावसह राज्यातील काही भागात अवकाळीसह गारपीट झाली. यामुळे ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढउतार दिसून आले. यातच आता उत्तरेकडून येणाऱ्या थंड वारे आणि ढगाळ वातावरणामुळे जळगाव शहराचे तापमानात मोठी घसरण दिसून आली.
रविवारी जळगाव शहराचे कमाल तापमान ३०.३ तर किमान तापमान १८.५ अंशावर नोंदविले गेले. दरम्यान, तीन दिवसापूर्वी म्हणजेच १ मार्चला जळगावचे कमाल तापमान ३७.८ अंश इतके होते. यामुळे उन्हाच्या झळा बसत होते. मात्र गेल्या दोन तीन दिवसात तापमानात पुन्हा बदल पाहायला मिळाला.
हवामान खात्याने जळगावसह राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार दोन तीन दिवसापूर्वी जळगावसह राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे शेतातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान,रविवारी दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. यामुळे तापमानात मोठी घट झाली.
काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत आहे. परिणामी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वारे आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यातील जळगावसह अनेक शहरांचे तापमान घटले आहे. आज सोमवारी जळगावात पहाटेपासून थंड वारे वाहू लागले आहे. पहाटे मोठ्या प्रमाणत थंडी जाणवली. दरम्यान, आगामी दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान खात्याने वर्तविला आहे.