जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२४ । एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असताना दुसरीकडे तापमानाचा उच्चांकही वाढताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा ४२ अंशावर होता. उन्हाच्या दाहकतेत जळगावकर होरपळून निघत आहे. उन्हाचा चटका वाढल्यामुळे दुपारच्या वेळेस रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. दरम्यान, जळगावसह राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर प्रति चक्रवाताची स्थिती कायम असल्यामुळे मागील चार-पाच दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत आहे. त्यात आग्नेय दिशेने येत असलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्याची भर पडली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कमाल-किमान तापमानातील वाढीचा कल कायम राहण्याचा अंदाज आहे. जळगाव, नाशिक, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस रात्रीच्या तापमानात वाढ होऊन रात्रीही उकाडा वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
जळगावात तापमानाने सलग दुसऱ्या दिवशी ४२ शी ओलांडली आहे. यंदाच्या मार्च महिन्यातच जळगावात तापमानाने उच्चांकी गाठली आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाची तीव्रता कशी राहणार? या चिंतेत जळगावकर आहेत. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या सत्रात सर्वाधिक उन्हाच्या झळांनी अंगाची लाहीलाही झाली. पंख्यांमधून उष्ण हवा येत आहे. दिवस-रात्रीचा उकाडा वाढल्याने जळगावकर हैराण झाले आहेत.
दरम्यान उन्हापासून सरंक्षण मिळण्यासाठी नागरिक शीतपेयांसह कुलर, एसी बसविणे पसंत करीत आहे. दुपारच्या उन्हाच्या तीव्रतेने नागरिकांची रस्त्यांवरील वर्दळ कमी झालेली दिसून येत आहे.