जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । सध्या राज्यात उष्णतेची लाट आल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४३ ते ४४ वर गेल्याने अंगाची लाही लाही होत आहे. मंगळवारी जळगाव जिल्ह्यात तापमान ४३.१, तर किमान तापमान २६ अंश एवढे होते. दरम्यान, आज २० एप्रिल रोजी जळगावचे तापमान १ अंशाने वाढून ४४ पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
यंदा मार्च महिन्याच्या मध्यंतरी राज्यातील अनेक ठिकाणी उन्हाचा पारा ४० अंशावर गेला होता. त्यावेळी सकाळपासून उन्हाचा कडाका जाणवत होता. त्यानंतर ६ एप्रिल रोजी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.८ तापमान नोंदवले गेले. भुसावळातील केंद्रीय जलआयोगाच्या कार्यालयात ही नोंद झाली होती. यानंतर सलग चार दिवस जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. नंतरदेखील पारा सलग ४१ अंशांपेक्षा जास्त राहिला.
१५ एप्रिलपासून एक ते तीन अंशांची घट होऊन पारा चाळिशीवर थांबला. यामुळे उष्णतेच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र, १९ एप्रिल रोजी पुन्हा चटके जाणवले. जळगावचे तापमान ४३.१, तर किमान तापमान २६ अंश एवढे होते. आज बुधवारी जळगावचे तापमान १ अंशाने वाढून ४४ पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
तर राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. २१ ते २३ एप्रिलला दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. मात्र, जळगावात तशी शक्यता नसल्याने तापमान चढेच राहणार आहे. जर अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास याचा मोठा फटका हा पिकांना बसू शकतो, उन्हाळी बाजरीसह ज्वारीच्या पिकाला देखील पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच आंब्यांच्या बागांचे देखील नुकसान होऊ शकते.
जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?
वेळ – अंश
११ वाजेला – ३८ अंशापुढे
१२ वाजेला – ३९ अंश
१ वाजेला – ४१ अंश
२ वाजेला- ४२ अंशापुढे
३ वाजेला – ४३ अंश
४ वाजेला – ४३ अंश
५ वाजेला – ४२अंश
६ वाजेला – ४१अंश
७ वाजेला – ३९ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३७ अंशावर स्थिरावणार.