जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२६ । जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाने अचानक उसळी घेतली असून उन्हाचा तडाखा वाढला आहे. यामुळे उकाड्यातही वाढ झाल्याने जळगावकर हैराण झाला. दरम्यान, जळगावकरांसाठी आगामी दोन दिवस महत्वाचं असणार आहे. कारण हवामान विभागाने जळगावसाठी दोन दिवसांचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. १० आणि ११ मार्चदरम्यान जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून तापमानाचा पारा ४० ते ४१ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

जळगावचे कमाल तापमान रविवारी ३८ अंशावर होते. मात्र यात सोमवारी एकाच दिवसात १.६ अंशांची वाढ झाल्याने ते ३९.६ अंशांवर पोहोचले. जी या हंगामातील आतापर्यतची सर्वोच्च नोंद आहे. केवळ तापमान वाढ नाही, तर वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांना कमालीचा उकाडा जाणवत आहे. दरम्यान, दिवसाच्या तापमानात वाढ झाली असली तरी रात्रीच्या तापमानात किंचित घट नोंदविण्यात आलीय. रविवारी १६.२ अंशावर असलेले किमान तापमान सोमवारी १५.२ अंश इतके होते.

दरम्यान, जळगावात कमाल तापमानाचा पारा वाढल्यानं सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत आहे. तीव्र उन्हामुळे दुपारच्या वेळी मुख्य बाजारपेठ आणि रस्त्यांवरील वर्दळ लक्षणीयरीत्या घटलेली दिसून येत आहे. हवामान विभागाने आगामी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तविला असून, त्यानंतरही पारा ४० अंशांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे.
आगामी पाच दिवसांची स्थिती…
दिनांक..तापमान आणि वातावरणाचा अंदाज
१० मार्च : ४१ अंश.. उष्ण व उकाडा जाणवणार
११ मार्च : ४० अंश.. उष्ण
१२ मार्च : ३९ अंश.. कोरडे
१३ मार्च : ३८ अंश.. कोरडे
१४ मार्च : ३८ अंश.. कोरडे







