जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२५ । गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे उष्णतेपासून जळगावकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या दोन तीन दिवसापासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असून, रविवारी एप्रिलमधील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. रविवारी ६ एप्रिल रोजी जळगावचा पारा ४२.५ अंशापर्यंत पोहचला होता. यामुळे उष्णतेपासून जळगावकर होरपळला आहे. दरम्यान, आगामी दोन दिवस जळगाव शहराच्या तापमानात अजून वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

सध्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात राजस्थान, मध्यप्रदेश मार्गे उष्ण वारे वाहत आहेत. त्यातच हवामान कोरडे असल्याने उन्हाच्या झळा अधिक जाणवत आहेत. वातावरणातील बाष्पाचे प्रमाण आता कमी झाले आहे. त्यात उष्ण लहरींमुळे तापमानाचा पारा अधिकच वाढला आहे. शनिवारी जळगावचा पारा ४०.५ अंशावर होता. तर रविवारी एकाच दिवसात तापमानात २ अंशाची वाढ होऊन, पारा ४२.५ अंशावर पोहोचला होता. या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद रविवारी करण्यात आली आहे. सकाळी ११ ते ५ पर्यंत कडक उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य होते. तापमान प्रचंड वाढल्यामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत.
तापमानाचा पारा आणखी वाढणार ?
यंदा मार्च महिन्यात जरी तापमानाचा तडाखा फारसा जाणवला नसला तरी एप्रिल महिना मात्र चांगलाच तापदायक ठरण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. आगामी दोन आठवडे तरी जळगाव जिल्ह्यात कोरडे हवामान कायम राहणार आहे. त्यामुळे तापमानाचा पारा ४५ अंशावर जाऊ शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
आगामी पाच दिवसांचा तापमानाचा अंदाज
७ एप्रिल- ४१ अंश
८ एप्रिल- ४२ अंश
९ एप्रिल- ४२ अंश
१० एप्रिल- ४३ अंश
११ एप्रिल- ४१ अंश
राज्यात काय स्थिती?
राज्यात अवकाळी पावसाने उसंत घेतली असून दुसरीकडे उन्हाचे चटके आणखी वाढणार आहे मुंबईमधील तापमान वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांतील तापमानात वाढ होऊन उन्हाच्या झळा आणखी वाढणार आहेत. तर उकाड्यातील वाढ कायम राहिल. आज कोकणात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरीत राज्यात ढगाल वातावरण राहिल आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. वाढती उष्णता लक्षात ङेता नागरिकांनी काळजी घ्यावी असे देखील सांगितले जात आहे.