जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२५ । जळगावात तापमानाचा तडाखा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. मागील दोन तीन दिवस तापमानाने ४४ अंशापर्यंत मजल मारल्याने दुपारी घराबाहेर पडणे मुश्किल झाले. मात्र रविवारी तापमानात घसरण दिसून आली. मात्र उकाडा कायम होता. शनिवार ४४ अंशापर्यंत असलेला पारा रविवारी ४१ अंशापर्यंत होते. दरम्यान आज तापमानात ३ ते ४ अंशापर्यंतची वाढ होण्याची शक्यता आहे.

उत्तर-पश्चिमेकडून ताशी २५ किलोमीटर वेगाने येणारे कोरडे वारे राजस्थानच्या वाळवंटातून जळगाव जिल्ह्याच्या दिशेने येत आहेत. या वाऱ्यांमुळे आज जिल्ह्यात सोमवारपासून तापमान ४५ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दुसरीकडे अवकाळी पावसाची शक्यता नाही. रविवारी कमाल तापमान ४१ अंशांवर होते. किमान तापमानातही वाढ होत असल्याने रात्री ८ वाजेपर्यंत उकाडा जाणवत होता. जळगावात तापमानाचा पारा वाढत चालला असून यामुळे वाढत्या उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. नागरिकांच्या अंगाची अक्षरश: लाही लाही होत आहे. दरम्यान २२ एप्रिलपर्यंत वातावरण ढगाळ राहील, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.
राज्यातील तापमानाची स्थिती?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता आणखी वाढणार आहे. आज विदर्भातील नागपूर आणि अकोला येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. या तिन्ही जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरण आणि उष्ण हवामानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.