जळगाव लाईव्ह न्यूज । अवकाळी पावसानंतर आता जळगावसह राज्यात सूर्य आग ओकत आहे. जळगावात यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. शुक्रवारी जळगाव शहराचे परिसरातले तापमान ४४ अंशावर पोहोचले आहे. सकाळपासूनच उन्हाची अधिक तीव्रता जाणवत होती. दुपारी प्रचंड उष्णतेने अंगाची लाही लाही होऊन नागरिक कासावीस झाले होते. दरम्यान उद्यापासून आगामी तीन चार दिवस तापमानात २ अंशापर्यंतची वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात होळीच्या अगोदर म्हणजे फेब्रुवारीपासून जळगावातील तापमान वाढत आहे. चालू एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा उत्तरोत्तर वाढत असल्यामुळे सूर्यनारायण कोपले की काय, अशी चिंता वाढविणारी स्थिती दिसून येते. या तापमानामुळे जळगावची वाटचाल ‘जळ’ गाव झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान काल शुक्रवारी जळगावचे कमाल तापमान ४४ अंशावर तर किमान तापमान २६ वर जाऊन पोहोचला आहे. यामुळे दिवसभर भाजून काढणारे ऊन पडत असून आता रात्रीही प्रचंड उकाडा जाणवत आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत उष्णतेच्या झळा बसत असून यामुळे जळगावकर हैराण झाला आहे. दरम्यान तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर-पश्चिमेकडून आणि नंतर गुजरातमार्गे व राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे २२ एप्रिलपासून तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी २० ते २२ एप्रिल दरम्यान सुद्धा सूर्य आग ओकणार असून या काळात कमाल तापमान ४४ ते ४६ दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्यांचा वेग ताशी २५ किलोमीटर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.गतवर्षी ३० एप्रिल रोजी तापमान ४४ अंशावर पोहोचले होते; पण यंदा १२ दिवसांआधीच म्हणजेच १८ एप्रिल रोजी कमाल तापमान ४४ अंशावर पोहोचल्याची नोंद झाली.