जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२५ । मागील काही दिवसापासून जळगावातील तापमानात वाढ पाहायला मिळाली. मात्र गुरुवारी या वाढीला ब्रेक लागला. बुधवारी पारा ४३.७ अंशांवर असलेला तापमानाचा पारा गुरुवारी घसरून ४२ अंशांवर आला. पारा १.७ अंशाने घसरला असला तरी उकाडा मात्र सारखाच जाणवत होता. दरम्यान पुण्याच्या हवामान खात्याने ११ ते १५ एप्रिलपर्यंत तापमानात घसरणीचा अंदाज वर्तविला आहे.

जळगावात मार्च महिन्यात ४० अंशापर्यंत गेलेल्या तापमानात एप्रिलच्या सुरुवातीलाच ढगाळ वातावरणामुळे घसरण झाली होती. तापमानाचा पारा ४० अंशाखाली गेल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र चालू आठवड्यापासून ढगाळ वातावरण निवळाल्याने तापमानात वाढू होऊन पारा ४४ अंशापर्यंत पोहोचला होता.
यामुळे सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत असून दुपारच्या वेळी तर घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे शहरातील रस्ते दुपारी सुनसान दिसून येतात. दिवसा बाजारपेठेतही शुकशुकाट असतो. दरम्यान काल गुरुवारी तापमानात घट दिसून आली. मात्र दिवसभर उकाडा कायम होता. सायंकाळी सहा वाजताही उन्हाच्या झळा बसत होत्या.
दरम्यान आठवड्यात राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे; परंतु जळगाव जिल्ह्यात तापमानात काही अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे. पुण्याच्या आयएमडीनुसार ११ ते १५ एप्रिलपर्यंत तापमान ३९ ते ४१ अंशांच्या आत राहू शकते.