जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२५ । जळगावात पुन्हा एकदा तापमानात वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसात कमाल तापमान ४ अंशापर्यंत वाढले आहे. यामुळे सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. दरम्यान, आज म्हणजेच ९ ते १३ मार्च दरम्यान किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून उद्या १० मार्चपासूनच तापमान चाळिशीपर्यंत पोहोचेल.

या आठवड्याच्या बुधवार आणि गुरुवारी या दोन दिवसात जळगावच्या किमान तापमानात ७ अंशापर्यंत घट झाल्याने रात्री गारवा जाणवला. गुरुवारी किमान तापमान १० अंशाखाली गेले होते. कमाल तापमान देखील घसरले होते. ३६ अंशांवर असलेला दिवसाचा पारा ३३ वर आला होता. मात्र शुक्रवारपासून तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे.
शनिवारी जळगावचे किमान तापमान ११.५ अंश तर कमाल तापमान ३७.५ अंशापर्यंत पोहोचला आहे. पहाटे काहीशा गारवा जाणवत आहे, मात्र दुपारच्या वेळेस उष्णतेच्या प्रचंड झळा जळगावकरांना बसत आहे. आजपासून १३ मार्चपर्यंत तापमानाचा पारा आणखी वाढणार आहे,या दरम्यान कमाल तापमान ३९ ते ४१ अंशांवर तर किमान तापमान १९ ते २१ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यात एक ते दोन अंश तापमान अधिक राहिल.
राज्यात काय स्थिती?
राज्यात सोलापूरमध्ये सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूरमध्ये ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर निफाड येथे राज्यातील सर्वात निच्चांकी म्हणजेच ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर, रत्नागिरी, जेऊर, सांगली, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा येथे कमाल तापमान सातत्याने ३७ अंशांच्या वर गेले आहे.
पुणे, कोल्हापूर, निफाड, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि नागपूर येथे तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. राज्यातील कमाल तापमान सतत वाढत असल्यामुळे उष्णतेच्या झळा आणखी वाढल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.