जळगाव लाईव्ह न्यूज । अनेक बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून गंडविले जात असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहे. अशीच एक फसवणुकीचा प्रकार जळगावमधून समोर आला आहे. ज्यात भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप सी या पदावर मुलीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बनावट आदेश देत ३ जणांनी पिंप्राळ्यातील निवृत्ताची १३ लाखांत फसवणूक केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे

विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचारी गोकूळ पाटील (रा. पिंप्राळा) यांची मुलगी बीई झाली आहे. त्यामुळे ते मुलीसाठी नोकरीच्या शोधात होते. भाऊ मधुकरचा मित्र संजय कोळी (रा. जैनाबाद) यांच्याशी मार्च २०२३ मध्ये त्यांची भेट झाली. तेव्हा त्याने मुलीला रेल्वेत नोकरीत लावून देतो, माझा मित्र सतीश गोकूळ पाटील (रा. जुनोने, ता. अमळनेर) हे काम करून देईल. त्यासाठी १३ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्याप्रमाणे गोकूळ पाटील यांनी सतीश पाटील याची भेट घेतली, तेव्हा त्याने नाशिकमधील राम नारायण नेवाडकर आणि मी तुमच्या मुलीला नोकरी लावून देऊ असे सांगत १३ लाखांची मागणी केली.
त्यानंतर पाटील यांनी ८ मार्च २०२३ रोजी संजय कोळी याला १ लाख रुपये दिले. १८ मे २०२३ रोजी पाटील यांना घरी मुलीच्या नोकरीचे आदेश आले आणि ३० जून ते ५ जुलै दरम्यान कागदपत्रांसह मुंबई येथे हजर राहण्यास आदेशात म्हटले होते. नंतर गोकूळ पाटील यांनी सेवानिवृत्तीच्या रकमेतून सतीश पाटील याच्या खात्यावर ५ लाख तर नेवाडकर याच्या खात्यावर ५ लाख रुपये पाठवले. तसेच २ लाख रुपये रोख सतीश पाटील याला दिले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे
असे फुटले घटनेचे बिंग
मुलीला नोकरीवर हजर करण्यासाठी गोकूळ पाटील हे ३० जून २०२३ रोजी मुंबईच्या डीआरएम कार्यालयात गेले. तेथे अधिकाऱ्यांना नोकरीचा आदेश दाखवल्यावर त्यांनी आदेश बनावट असल्याचे सांगितले. पाटील यांनी लागलीच नेवाडकर, सतीश पाटील व संजय कोळी यांच्याशी संपर्क साधून फसवणूक केल्याचे म्हटले. तरी संशयितांनी मुलीची नोकरी पक्की असून, तुम्ही घाबरू नका, असे म्हटले. त्यानंतर गोकूळ पाटील यांनी वारंवार संपर्क साधला असता तिघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याची खात्री होताच, पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.