जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२३ । राज्यावर गेल्या दोन महिन्यापासून अवकाळीचे संकटामुळे तापमानाच्या पारामध्ये चढ उतार दिसून आला होता. एप्रिल महिन्यातील पंधरवडामध्ये जळगावातील काही ठिकाणी तापमानाचा पारा ४२ ते ४३ पर्यंत गेला होता. मात्र त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पारा पुन्हा घसरून ४० अंशाखाली आल्याने नागरिकांना काड्यापासून दिलासा मिळाला होता. मात्र आता तापमानात वाढ होत असून राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावात झाली आहे.
जळगावात काल बुधवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.८ तापमानाची नोंद शहरातील केंद्रीय जल आयोग कार्यालयात झाली. गेल्या तीन दिवसांतच शहराचे कमाल तापमान तब्बल ४.३ अंशांनी वाढल्याचे या नोंदीतून समोर आले.
पुढचे काही दिवस उष्णतेची लाट अशीच राहणार असल्याने नागरिकांनी उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. उत्तर-मध्यसह देशातील बहुतांश भागात तापमानात मोठी वाढ झाली आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रासह १७ राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, जळगावात तीन दिवसांतच शहराचे कमाल तापमान तब्बल ४.३ अंशांनी वाढलं आहे. सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका बसत आहे. दुपारी तर सर्व प्रमुख रस्ते, महामार्ग निर्मनुष्य होते.
नागरिकांनी काळजी घेण्याची गरज
दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, दुपारी स्वयंपाक करणे टाळावे, स्वयंपाकावेळी दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवाव्यात, जेणेकरून हवा खेळती राहील. उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळावीत. अनवाणी उन्हात चालू नये. लहान मुलांना व पाळीव प्राण्यांना आतमध्ये ठेऊन गाडी बंद करू नये. चहा, कॉफी, मद्य, खूप साखर असलेली व कार्बोनेडेट द्रव्याचे सेवन टाळावे. प्रथिनांची अधिक मात्रा असलेले पदार्थ तसेच शिळे अन्न टाळावे. सैलसर व सुती कपडे शक्यतो पांढरे कपडे वापरावेत, डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी.