गतवर्षीपेक्षा कमीच!! जळगावात आतापर्यंत ‘एवढ्या’ पावसाची नोंद, आता परतीच्या पावसाची तारीख आली
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२३ । राज्यात यंदा मान्सून रुसला आहे. जुलै महिन्यात धो-धो बरसलेल्या पावसाने काही दिवसापासून दडी मारली. मान्सूनचा ऑगस्ट संपायला आता अवघे चार दिवस उरले असून या दरम्यान, पावसाची शक्यता नगण्यच आहे. राज्यात सर्वत्र यंदा पावसाने सरासरी गाठली नाही. जळगाव जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत केवळ ३४२ ते ३४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी ४३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. दरम्यान, आता मान्सून कधी परतणार, अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. आता परतीच्या पावसाची तारीख समोर आली आहे.
दरम्यान, जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा यंदा इंचभरही वाढ झालेली नाहीय. गेल्या वर्षी या दिवसाच्या स्थितीत गिरणा धरणात ९२.३३ टक्के जलसाठा होता. मात्र तो यंदा ३७.१७ टक्क्यावर आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित दिवसांमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील परिस्थिती तशीच राहणार आहे. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 8 सप्टेंबरपासून 21 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस बघायला मिळू शकतो.
मान्सून परतणार कधी?
ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस पडत नसल्यानं नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मान्सून परतीच्या वाटेवर असेल तर, शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ होणार का, असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. मात्र, हवामान खात्याने परतीच्या पावसाबाबत कुठलाही अंदाज वर्तवलेला नाही. “सध्याची परिस्थिती बघता परतीच्या पावसाबद्दल आम्ही कुठलाही अंदाज बांधलेला नाही. परतीच्या पावसाची सुरुवात ही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होते. मात्र, सध्या तरी परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण नाही. सप्टेंबर महिन्यात येणारा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकेल”, असं हवामान खात्याचे प्रमुख के.एस. होसळीकर यांनी सांगितलं आहे.