⁠ 
सोमवार, एप्रिल 22, 2024

अखेर मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय ; जळगाव जिल्ह्यात कशी आहे पावसाची स्थिती?

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२३ । राज्यात मान्सून ११ जून रोजी दाखल झाला होता. मात्र चक्रीवादळामुळे पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांसह नागरिक आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकर्‍यांसह सर्वच हवालदिल झाले होते. मात्र काल शुक्रवारी राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी काहीसा सुखावला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्याला आजपासून दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार महराष्ट्रात मान्सूनच आगमन झाल आहे. पूर्व विदर्भात मान्सूनचे आगमन झाले असून आज मान्सून विदर्भ व्यापण्याची शक्यता आहे. 25 जूनपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. येत्या ४८ तासात राज्यातल्या सगळ्याच भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, पावसाळा सुरू होऊन २४दिवस उलटले तरी देखील अद्याप जळगाव जिल्ह्यात कुठेही पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांसह नागरिक आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात २३ दिवस पावसाने हजेरी लावली होती. मात्र यंदा अद्यापही पाऊस झालेला नाहीय. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात ऊन-सावलीचा खेळ पाहायला मिळत आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा ३८ अंशपर्यंत घसरल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला मात्र पाऊस नसल्याने सगळेच चिंतेत होते.

जळगावला दोन दिवस येलो अलर्ट?
काल शुक्रवारी सायंकाळी ढग दाटून आले. जोरदार पाऊस होणार असं वाटत होते. मात्र काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. यामुळे हवेत थोडाफार गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, आयएमडीच्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्याला आज शनिवारी आणि उद्या रविवारी या दोन दिवसासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मान्सून लवकरच राज्य व्यापणार असून यामुळे जिल्ह्यात देखील चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.