जळगावातील राजकारण तापले ; शरद कोळी अज्ञातस्थळी रवाना?
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । जळगावातील राजकारण प्रचंड तापले आहे. कारण ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत शिंदे गटावर आगपाखड करणारे शरद कोळी यांना भाषण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या भाषणावर बंदी घातल्यामुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.दरम्यान, भाषणबंदीनंतर पोलिसांकडून शरद कोळी यांना ताब्यात घेतले जाईल, अशी चर्चा होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस शरद कोळी यांना ताब्यात घेण्यासाठी गेलेही होते, मात्र ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे शरद कोळी हे अज्ञातस्थळी रवाना झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
ठाकरे गटाकडून शरद कोळी यांच्यावर युवासेनेचे राज्य विस्तारक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर शरद कोळी अत्यंत आक्रमक शैलीत ठाकरे गटाची बाजू मांडत असून ते सातत्याने शिंदे गटाच्या नेत्यांना अंगावर घेत आहेत. दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसात धरणगाव, पाचोरा येथे त्यांच्या यात्रेनिमित्त सभा झाल्या आहेत. धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील याच्या मतदार संघातही सभा झाली. या वेळी शरद कोळी यांनीही जोरदार भाषण केले. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर टीका करतांना कोळी यांनी गुर्जर समाजावर टीका केल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत समाजातर्फे जिल्हा पोलीस अधिक्षकांनाही निवेदन देण्यात आले होते.
याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शरद कोळी यांना जळगावात कुठेच भाषण करता येणार नाही, असा आदेश काढला. जिल्हाधिकाऱ्यांनी कोळी यांना भाषण करण्यास बंदी घातल्यामुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
विशेष म्हणजे पोलीस ही नोटीस घेऊन शरद कोळी यांचे वास्तव्य असलेल्या हॉटेलवर पोहोचले होते. त्यावेळी पोलीस हे शरद कोळी यांना अटक करण्यासाठी आले आहेत, असा कार्यकर्त्यांचा समज झाला. त्यामुळे हॉटेलच्या परिसरात जमा झालेले शिवसैनिक आक्रमक झाले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांकडून शरद कोळी यांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन शरद कोळी हे सध्या अज्ञातस्थळी रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.