जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । कोविडच्या जागतिक महामारीत जळगाव शहरात आयएमए जळगांवचे डॉक्टर सदस्य वैद्यकीय सेवेचे आपले कर्तव्य अतिशय हिंमतीने आणि जबाबदारीने बजावत आहेत. परंतु अशा गंभीर रुग्णांवर उपचार करतांना ऑक्सिजनच्या पुरवठ्याबद्दल अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले असून तश्या तक्रारी डॉक्टरांनी आयएमएकडे केल्या होत्या. तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी आयएमएतर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेण्यात आली.

जिल्हाधिकारी यांची भेट घेताना आयएमएचे अध्यक्ष डॉ.सी.जी.चौधरी, सचिव डॉ.राधेश्याम चौधरी, डॉ.अनिल पाटील, डॉ.स्नेहल फेगडे, डॉ.जितेंद्र कोल्हे, डॉ.दिलीप महाजन आदी उपस्थित होते.
आयएमए जळगावतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात खालील मागण्यांचा समावेश आहे.
१) अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात होत नसून त्यामुळे रुग्णावरील उपचार करतांना अडचणी वाढत आहेत.
२) शासनाने ठरवून दिलेल्या मानकांप्रमाणे ऑक्सिजनचे पुरवठादार सिलेंडर भरून न देता कमी प्रमाणात (वस्तुमान) आणि अतिशय कमी दाबाने ऑक्सिजन पुरवठा करीत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळेनासा झाला आहे.
३) शासनाने ऑक्सिजन सिलेंडरचे दर ठरवून दिलेले असतानाही पुरवठादारांकडून त्या शासकीय दरापेक्षा जास्त प्रमाणात पैसे रोखीने घेऊन सिलेंडर पुरवले जात आहे.
४) ड्युरा सिलेंडर आणि जम्बो सिलेंडर साठी सुद्धा बऱ्याच वेळेस पुरवठादारांकडून आम्हाला तुम्हीच तुमच्या वाहनाने तुमच्या माणसाला सिलेंडर घेऊन पाठवा आणि ऑक्सिजन घेऊन जा अशी सक्ती केली जात आहे. त्यासाठीही जास्तीचे पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ठरवून दिलेल्या शासकीय दरापेक्षा जास्त दर आकारणी करून डॉक्टरांची आर्थिक लूट केली जात आहे.
५) तसेच नॉन कोविडं रुग्णालयातही नियमितपणे होणाऱ्या गंभीर रुग्णांच्या तातडीच्या (इमर्जेंसी) शस्त्रक्रियांसाठी भुल देतांना ऑक्सिजनची नितांत आवश्यकता असते. परंतु आम्हाला त्यासाठी नियमितपणे सिलेंडर पुरवठा होत नाही आणि जो होतो तो सुध्दा कमी दाबाने भरलेल्या सिलेंडरचा आणि अवास्तव दराने आकारणी करून होतो आहे. त्याही रुग्णांचे आरोग्य मौल्यवान आहेच. अश्याप्रकारे अनियमितपणाने, अतिशय कमी प्रमाणात शासकीय नियमातील मानांकनापेक्षा कमी दाबाने आणि अतिशय जास्त अवाजवी दराने डॉक्टरांना सध्या ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.
त्यामुळे या जागतिक महामारीत रुग्णाच्या जीवाशी खेळ केला जात असून डॉक्टरांची आर्थिक पिळवणूक देखील केली जाते आहे. या असल्या गंभीर प्रकारांमुळे आणि वेळेवर न मिळालेल्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे कोविडं आणि नॉन कोविडं रुग्णालयांना वेठीस धरले जात असून रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जातो आहे.
म्हणून या ऑक्सिजनच्यावर नमूद केलेल्या गंभीर तृटींमुळे निर्माण होणाऱ्या आपातकालीन संकटांची जबाबदारी ही जळगांव आयएमएच्या डॉक्टरांची राहणार नसून ही जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील याची कृपया नोंद घ्यावी आणि रुग्णांच्या जीवाशी होणारा हा खेळ यांबवावा आणि या समस्येसाठी जे संबंधित जबाबदार आहेत त्यांची चौकशी तपासणी होवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, तत्सम आदेश काढावे, अशी मागणी आयएमएतर्फे करण्यात आली आहे.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/469593991043065