जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२३ । दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्याचे या वर्षी जळगांव महानगरपालिकेने नियोजन केले आहे. यंदाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या निकालात अव्वल गुणांनीं उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थींना महानगरपालिकने शिष्यवृत्ती देण्याचे ठरविले आहे.
महानगरपालिकेतर्फे मागील वर्षी ही योजना सुरु करण्यात आली होती. त्यावेळी ही योजना मुले व मुली दोघांसाठी राबविण्यात आली होती. परंतु, यावर्षी त्यात बदल करून त्यात फक्त मुलींचाच समावेश करण्यात आला आहे.
कोणाला मिळणार शिष्यवृत्ती अन् किती रुपये मिळणार?
दहावीमध्ये ८५ टक्के गुण मिळवणाऱ्या पिवळ्या रेशन कार्डधारक विद्यार्थिनींना सहा हजार रुपये तर केशरी कार्डधारक असलेल्या विद्यार्थिनींना पाच हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती महानगरपालिकेतर्फे देण्यात येणार आहे. तर, बारावीतील ८० टक्के गुण असलेल्या विद्यार्थिनींना अनुक्रमे सात व पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
कुठे करावा अर्ज?
जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे राबविली जाणारी ही शिष्यवृत्ती योजना महिला व बालविकास विभागाच्या निधीतून राबविण्याची मंजुरी घेण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गुणपत्रक, रेशनकार्ड, रहिवासी पुरावा आणि पासबुकची झेरॉक्स इ. कागद्पत्रकांची जोडणी करून अर्ज महानगरपालिकेच्या बाराव्या मजल्यावर ३१ जुलैपर्यंत जमा करावयाचे आहे. तसेच, या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत गुणवंतांसमवेत खेळाडूंचा देखील सत्कार करण्यात येणार आहे. यात मुले व मुली दोघींचाही समावेश असणार आहे. प्रथम तीन खेळाडूंना अनुक्रमे २१ हजार, ११ हजार व ५ हजार या प्रमाणे रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तर, इतर २५ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.