जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून सर्वाधिक बाधित रुग्ण शहरात आढळून येत आहे. दरम्यान, महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या वैद्यकिय सेवा – सुविधा उभारण्यासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी आमदार निधीतून १ कोटी निधी देण्याची घोषणा केली. शहरातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आ. राजूमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ते बोलत होते.
दरम्यान, खाजगी रुग्णालय कोविड रुग्णांकडून अवाढव्य बिल आकारात असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्यानंतर खाजगी रुग्णालयांनी असे बील आकारू नये, अन्यथा दोषींवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही कोरोना आढावा बैठकीत खाजगी रुग्णालयांना देण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, मनपा उपायुक्त गोसावी , कपिल पवार, नगरसेवक सुनील महाजन , भाजप गटनेते भगत बालाणी, नगरसेवक विशाल त्रिपाठी, नगरसेवक कुंदन काळे ,मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.शिरीष ठुसे , मनपा वैद्यकीय अधीक्षक राम रावलानी, विजय घोलप आदींची उपस्थिती होती.
जास्त नागरिकांची कोरोना चाचणीवर भर द्या
आमदार भोळे यांनी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांची कोरोना चाचणी करण्यावर भर देणे व कोरोना काळात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले. बैठकीत शहरांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर जास्तीत जास्त भर दिला जावा, तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता १४ दिवस विलगीकरणात रहाणे बंधनकारक करण्यात आला असून यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होणार आहे. बैठकीत महापौर जयश्री महाजन यांनी महापालिका प्रशासनातर्फे प्रत्येक वार्डात राबविण्यात येत असलेल्या कोरोना चाचणी कॅम्पबाबत सूचना केल्यात. या कॅम्पला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभत असल्याचे निदर्शनास आणून देत अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्येक घरात जाऊन कोरोना चाचणीबाबत जनजागृती करून चाचणीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना दिल्यात.
चांगल्या दर्जाचे जेवण देण्यात यावे
कोवीड केअर सेंटर मधून काही रुग्णांनी जेवणा संबंधित तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे आता कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना पोषक, चांगल्या दर्जाचे आणि वेळेवर जेवण देण्यात यावे,अशा सूचना आमदार सुरेश भोळे यांनी बैठकीमध्ये केल्या आहेत. कोवीड केअर सेंटरमधील रुग्णांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उत्तम त्या केली जावी, असेही बैठकीमध्ये सूचित करण्यात आले.