जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२५ । महागाई सर्वसामान्यांची पाठ काही सोडताना दिसत नसून यातच सर्वसामान्यांवर महागाईचा नवा भार पडला आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने प्रति लिटर २ रुपयांनी दरवाढ जाहीर केली आहे. याचा परिणाम गृहिणींपासून ते चहावाल्यांपर्यंत सर्वच ग्राहकांवर होणार आहे.

दूध संघाने जाहीर केलेली ही दर वाढ चार दिवसापासून लागू करण्यात आली आहे. या दरवाढीचा मोठा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या लोकांसाठी दूध महाग होणे म्हणजे आणखी एक आर्थिक भार आहे. अनेक हॉटेल आणि चहावालेही या दरवाढीमुळे त्यांच्या उत्पादनांची किंमत वाढवण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. दुधाच्या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
दुधाच्या दरवाढीमागे अनेक कारणे आहेत. गाई व म्हशींसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या किमतीत वाढ झाली आहे. शिवाय, इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे वाहतूक खर्चही वाढला आहे. शेतीसाठी लागणाऱ्या खते व औषधांच्या किमतीत वाढ झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च वाढले आहेत. परिणामी, दूध संघटनांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता म्हशीचे दूध ६४ रुपये तर गायीचे दूध ५४ रुपये लिटर प्रमाणे विक्री होत आहे.
दूध प्रकार… पूर्वीचे दर … नवे दर
गोल्ड… ७० … ७२
म्हशीचे दूध… ६२… ६४
गायीचे दूध … ५२… ५४