जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढू लागला आहे. जिल्ह्यात सोमवारी कमाल तापमान ३८ अंश नोंदविले गेले. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाचे चटके लागू लागले आहे. दरम्यान, आज मंगळवारी (ता. १५) तापमान ४० अंशांवर, तर बुधवार (ता. १६)पर्यंत चाळिशी पार करेल. २१ मार्चपर्यंत ४४ अंशांपर्यंत तापमान जाईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या आठवड्यात राज्यासह जिल्ह्यावर अवकाळीचे संकट आले होते. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट नोंदविली गेली होती. मात्र त्यानंतर कमाल तापमानात वाढ होत असल्याचे दिसतेय. तसेच राज्यातील विविध भागात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सोमवारी जळगाव शहरासह जिल्ह्यात ३८ अंश तापमान नोंदविले गेले. यामुळे उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.
नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी डोक्यावर टोपी, हातात रुमाल, महिलांनी स्कार्फ, सनकोटचा वापर सुरू केला आहे. बाजारपेठेत ग्रीननेट किंवा ताडपत्री टाकून उन्हापासून संरक्षण केले जात आहे. आज दुपारनंतर उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. तापमानापासून गारवा मिळण्यासाठी शीतपेय, उसाचा रस, ताक घेणे सुरू केले आहे.
काय काळजी घ्याल?
घरातून बाहेर पडण्यापूर्वी पाणी आणि थंड सरबत प्यावे.
थोड्या-थोड्या वेळाने पाणी प्यावे.
उन्हात घरातून बाहेर पडताना छत्रीचा वापर करावा.
दिवसातून दोन-तीन वेळा लिंबू पाणी प्यावे.
उष्णतेच्या झळा बसल्यानंतर तात्काळ सावलीत बसावे.
उन्हामुळे तब्येत बिघडल्यानंतर तात्काळ संबंधिताला रुग्णालयात दाखल करावे.
‘या’ गोष्टी करू नका!
उपाशी पोटी घरातून बाहेर पडू नये.
सिंथेटिक, पोलिस्टर कपडे परिधान करू नका.