जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२४ । पावसाने कायमची माघार घेतल्यानंतर आता जळगावसह राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. पण अद्याप पूर्णपणे थंडी सुरु झालेली नाही.
जळगावमध्ये गेल्या तीन दिवसात तापमानाचा पारा दोन अंशाने घसरलेला दिसून आला. सध्या जळगावचे कमाल तापमान ३३ अंशावर आणि किमान तापमानाचा पारा १६ पोहोचल्याने रात्री हवेत गारवा जाणवत आहे. सकाळीही हुडहुडी थंडी जाणवत आहे. मात्र दुपारी ऊन्हाचा चटका बसत आहे,
पुढील पाच दिवस राज्यात कसं असेल तापमान?
राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. पण महाराष्ट्रात नोव्हेंबर अखेर थंडी सुरु होण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता कमीच आहे. कोरड्या हवामानासह निरभ्र आकाश राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर भारतात काही भागात गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. परंतु महाराष्ट्रात मात्र कडाक्याच्या थंडीसाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. राज्याच्या तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसनं चढ-उतार होऊ शकतो. पुढील पाच दिवस मुख्यत: कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता केंद्रीय हवामान विभागाने वर्तवला आहे.