जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाहेर जिल्ह्यातील एका अट्टल मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून या कारवाईत चोरट्यांकडून चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अटक केलेल्या संशयित आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत असे की, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रेकॉर्डवरील गुन्हेगार भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ (रा. सोनगाव, ता. मालेगाव) हा त्याचे साथीदार आकाश गोविंद गायकवाड (रा. जळगाव फाटा, निफाड) आणि दादु संजय सोनवणे (रा. दरेगाव, ता. मालेगाव) यांच्यासोबत मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये सक्रिय आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून भगवान उर्फ लंगड्या याला जळगाव फाटा, निफाड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचे साथीदार आकाश गायकवाड याला सटाणा (ता. सटाणा) आणि दादु सोनवणे याला दरेगाव (ता. मालेगाव) येथून अटक करण्यात आली.
पोलिसांनी या तिन्ही संशयित आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी चाळीसगाव शहर व तालुका भागातून तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांसाठी वापरलेली आणखी एक दुचाकी मोटारसायकल देखील आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ याच्यावर जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांमध्ये यापूर्वीही दरोडा, जबरी चोरी आणि चोरीचे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत.अटक केलेल्या संशयित आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.