जळगाव लाईव्ह न्यूज । खान्देश आणि मराठवाडा यांना थेट जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी जळगाव–जालना रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती मिळाली असून रेल्वे विभागाने या मार्गाचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. जळगाव ते जालना दरम्यान एकूण १८ थांबे प्रस्तावित करण्यात आले असून विविध ठिकाणी रेल्वे गेट उभारले जाणार आहेत.

प्रस्तावित आराखड्यानुसार, जळगाव जिल्ह्यातील धानवड, सुनसगाव आणि वाकोद येथे ‘हॉल्ट’ची तरतूद करण्यात आली आहे. तर नशिराबाद, नेरी आणि पहूर रोड येथे रस्ते क्रॉसिंग असणार असून या ठिकाणी रेल्वे गेट उभारले जातील. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या दळणवळणाच्या सोयी लक्षात घेऊन नियोजन करण्यात आल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. माहितीनुसार, जळगाव एमआयडीसीच्या विस्तारासाठी कुसुंबे खुर्द शिवारातील जमीन संपादन करण्यात येणार आहे. तसेच कुसुंबे शिवारालगतच्या पिंपळे गावातूनही रेल्वेमार्गासाठी जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे रेल्वेमार्ग नेमका कोणत्या मार्गाने जाणार, याचे चित्र स्पष्ट झाले असून स्थानिक पातळीवर हालचालींना वेग आला आहे.

विशेषतः हा रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर जळगाव एमआयडीसीतील उद्योजकांसाठी प्रगतीची नवी दारे उघडणार आहेत. सध्या एमआयडीसीतील मालाची वाहतूक प्रामुख्याने रस्त्यामार्गे होते. हा प्रवास खर्चिक आणि वेळखाऊ आहे. मात्र, एमआयडीसीच्या उंबरठ्यावर रेल्वे सेवा उपलब्ध होणार असल्याने कच्चा माल आणणे आणि पक्का माल बाहेर पाठविणे सोयीचे होणार आहे.








