जळगाव जिल्हाहवामान

जळगावकरांनो सावधान! पुढील ४८ तास उष्णतेचा प्रचंड तडाखा; वाचा तापमानाचा अंदाज?

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२६ । जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या भाजून काढणारे ऊन पडत असून, वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असून पुढील ४८ तास जळगावकरांसाठी अधिक जिकरीचे ठरणार आहेत.

कारण हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली असून, आज मंगळवारी (१२ मे) पारा थेट ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचण्याचा अंदाज आहे. यामुळे जळगावकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेय.

काल सोमवारी (११ मे) जळगाव शहराचे कमाल तापमान तब्बल ४५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे दुपारच्या वेळी जळगावकरांना असह्य उकाड्याचा आणि गरम हवेचा सामना करावा लागला. आता आगामी दोन दिवस तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली असून, आज मंगळवारी (१२ मे) पारा थेट ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

आज मंगळवार आणि बुधवार या दोन्ही दिवशी उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता असून सकाळी ९ वाजल्यापासूनच दुपारसारखे कडक ऊन जाणवत असून, वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता आणखी वाढत असल्याने शहरातील प्रमुख रस्तेही ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या वेळीही उष्ण वारे वाहत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. १४ मे पासून तापमानात किरकोळ घट होणार असली, तरी उन्हाचा चटका कायम राहणार असल्याने नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

दुपारी घराबाहेर पडणे टाळा
सतत वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच मजुरांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरणे, तसेच तेलगट आहार टाळावा.

चालू आठवड्यातील तापमानाचा अंदाज
तारीख, तापमान आणि हवामान खात्याचा इशारा

१२ मे : ४६ अंश, उष्णतेची लाट
१३ मे : ४६ अंश, उष्णतेची लाट
१४ मे : ४४ अंश, निरभ्र आकाश
१५ मे : ४३ अंश, निरभ्र आकाश
१६ मे : ४२ अंश, निरभ्र आकाश
१७ मे : ४१ अंश, दिवसभर आकाश अंशतः ढगाळ

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button