जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२५ । गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्यासह चांदीच्या किमतीने जोरदार उसळी घेतली आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत शुक्रवार सोने दरात प्रति तोळा ८०० रुपयाची तर चांदी दरात तब्बल १ हजाराची वाढ झाली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याने जीएसटीसह 90 हजारांचा टप्पा ओलांडला असून यामुळे खरेदीची योजना आखणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.

उद्या ३० मार्च रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. या दिवशी लोकं नवीन वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य दिलं जातं. विशेषत: लोकं या दिवशी सोनं खरेदी करण्याला अधिक महत्त्व देतात. अशातच सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. आज सकाळच्या सत्रात जळगावच्या सराफ बाजारात २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८२,२२८ रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर ८९ हजार ७०० रुपये (जीएसटीसह ९२,३९१) प्रतितोळ्यावर पोहोचले आहे. सोबतच काल चांदीच्या दरातही १ हजार रुपयांची वाढ होऊन भाव प्रतिकिलो १ लाख २ हजार रुपयांवर गेला आहे.
सोने-चांदीच्या भाववाढीला या आठवड्याच्या सुरुवातीला ब्रेक लागला होता. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात सोने दरात घसरण झाली होती. मात्र यांनतर सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात वाढ झाली. सोबतच गुढीपाडव्याला मागणीमुळे सोने भाव विनाजीएसटी ९० हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता सुवर्ण बाजारातून वर्तविली जात आहे.
वर्षभरात सोन्यात १८,२०० तर चांदी २०,५०० रुपयांची वाढ
गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याला २४ कॅरेट सोन्याचा ७१,५०० रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका होता. तर चांदीचा दर ८१,५०० रुपये प्रति किलो इतका होता. मात्र यंदा सोने दर विनाजीएसटी ९० हजारापर्यंत पोहोचला. वर्षभरात सोने दरात तब्बल १८२०० रुपयांची तर चांदी दरात २०५०० रुपयांची वाढ झाली आहे.