जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२४। दिवाळी पर्वाला सुरुवात झाली असून आज दिवाळीच्या सणातील महत्त्वाचा दिवस धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीच्या नवीन भांडी तसेच सोने आणि चांदी यांचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. दरम्यान अशातच सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने-चांदी खरेदीसाठी महत्त्वाचा मुहूर्त असलेल्या धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला, दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतींत घसरण झाली.
जळगाव सुवर्णपेठेत सोने दरात ४५० रुपयाची घसरण झाली. यामुळे आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,५६० प्रति तोळा तर २४ कॅरेटचा भाव ७९,१५० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर जीएसटीसह ८१,५२५ रुपये इतका आहे. तर चांदीत एक हजार ६०० रुपयांची घसरण होऊन ती ९६ हजार ७०० रुपयांवर आली.
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांत सोने भावात ७०० रुपयांची वाढ झाल्याने ते ७९ हजार ६०० रुपयांवर पोहोचले होते. मात्र, सोमवारी ४५० रुपयांची घसरण होऊन ते ७९ हजार १५० रुपये प्रतितोळ्यावर आले. तसेच ३०० रुपयांची वाढ होऊन ९८ हजार ३०० रुपयांवर पोहोचलेल्या चांदीच्या भावात सोमवारी एक हजार ६०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ती ९६ हजार ७०० रुपये प्रतिकिलोवर आली.
दरम्यान, गेल्या वर्षीच्या धनत्रयोदशीला जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ६०,५०० रुपयांवर होता. तर चांदीचा दर विनाजीएसटी ७१,२०० रुपये प्रति किलो इतका होता. मात्र यंदा दोन्ही धातूंमध्ये मोठी वाढ झाली. वर्षभरात सोने दरात जवळपास १८७०० रुपयापर्यंतची वाढ झाली तर दुसरीकडे चांदी दरात तब्बल २५,५०० रुपयाची वाढ झाली.