जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२४ । जागतिक घडामोडीमुळे या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण दिसून आली. मात्र तिसऱ्या दिवशी घसरणीला पुन्हा ब्रेक लागून दोन्ही धातूंमध्ये वाढ दिसून आली. बुधवारी सोने ३०० रुपयांनी वधारून ७६ हजार ५०० रुपये प्रति तोळा झाले तर चांदीच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ती ९० हजारांवर पोहोचली.
सोमवार व मंगळवार असे सलग दोन दिवस घसरण होऊन सोने-चांदीचे भाव प्रत्येकी दोन हजार ७०० रुपयांनी कमी झाले. त्यानंतर बुधवारी मात्र सोने भावात ३०० रुपयांची वाढ झाली. तसेच चांदीच्या भावात एक हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ९० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली.
महिन्याच्या सुरुवातीपासून चढ उतार सोने-चांदीच्या भावाची स्थिती पाहिली तर १ नोव्हेंबरपासूनच सोने- चांदीच्या भावात चढ-उतार सुरू आहे. १ नोव्हेंबर रोजीच सोने भाव ३०० रुपयांनी कमी होऊन ७९ हजार ७०० रुपयांवर आले. तर चांदीत एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ९७ हजार ५०० रुपयांवर आली होती. त्यानंतर हे भाव कमी-कमी होत गेले. दुसऱ्या आठवड्यात थोडीफार वाढ झाली मात्र १९ नोव्हेंबरपर्यंत पुन्हा घसरण होऊन या दिवशी सोने ७६ हजार ५०० रुपये तर चांदी २० हजारांवर आली. त्यानंतर पुन्हा वाढ झाली. तर २५ व २६ नोव्हेंबर रोजी मोठी घसरण झाली. २७ नोव्हेंबर रोजी भाव काहीसे सावरले.