जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२४ । सध्या जागतिक पातळीवर मौल्यवान धातूंच्या मागणीत वाढ झाली असून परिणामी भारतात सोने आणि चांदीच्या किमतींनी विक्रमी उसळी घेतली आहे. जळगावमधील सुवर्ण नगरीत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात ७०० रुपयांची तर चांदी दरात तब्बल अडीच हजार रुपयांची वाढ झाली. यामुळे सोन्याचा दराने ७५ हजाराचा टप्पा ओलांडला. Jalgaon Gold Silver Price 21 May 2024
गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात वाढ सुरु आहे. यापूर्वी मार्च आणि एप्रिलमध्ये सोने आणि चांदीने दमदार, चमकदार कामगिरी केली. मे महिन्याच्या सुरुवातीच्या 15 दिवसांत दोन्ही धातूंना कमाल दाखविता आली नाही. पण गेल्या आठवड्यापासून सोने चांदीच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे.
आताच सोने चांदीचा दर काय
जळगावमध्ये सोमवारी चांदीच्या भावात एकाच दिवसात अडीच हजार रुपयांची वाढ झाल्यामुळे चांदी ९२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सोन्यानेही ७०० रुपयांच्या वाढीसह ७५ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. जीएसटीसह सोन्याचा दर ७७,३५० रुपयांवर गेले आहे. या दोन्हीही मौल्यवान धातूंचा हा नवा उच्चांक ठरला आहे.
दरम्यान, भविष्यातही जागतिक पातळीवरील सोन्याची मागणी कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे आगामी काळातही सोने आणि चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे.
१३ दिवसांतच चांदीत १० हजारांनी वाढ
चांदीच्या भाववाढीचा वेग पाहिला तर १३ दिवसांतच दहा हजार रुपयांची वाढ झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला चांदी ८१ हजार रुपये होती. एका सप्ताहात ती ८२ हजार ७०० रुपयांपर्यंत पोहोचली. त्यानंतर १८ रोजी चांदीने ९० हजार रुपयांचा टप्पा गाठला आणि त्यानंतर सोमवारी तर अडीच हजारांची झेप घेत आता चांदीने एक लाखाकडे वाटचाल केली आहे. आताच्या भावानुसार एक किलो चांदीसाठी जीएसटीसह ९५ हजार २७५ रुपये मोजावे लागणार आहे