जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२४ । गेल्या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात सोने आणि चांदी दराने मोठी भरारी घेतल्याचं दिसून आले. एकीकडे दसरा आणि दिवाळी सारखे मोठे सण जवळ येऊन ठेपले असता यातच सोन्याचा दर नवीन उच्चांकीवर जाऊन पोहोचला.
पितृपक्षातच सोने ७५ हजारांचा टप्पा पार करून प्रति तोळा विनाजीएसटी ७६ रुपयांवर पोहोचले आहे. दरम्यान आता उद्या म्हणजेच ३ ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे.
दरम्यान नवरात्रोत्सवातच सोने प्रति तोळ्याचे दर ८० हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. केंद्र सरकारने आपल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात (बजेट) सोन्यावरील आयात शुल्क कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला. ज्यानंतर सोन्याचा दर उच्चांकावरून प्रचंड घसरुन स्वस्त झाले. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागील गेल्या काही दिवसात सोने दराने नवीन भरारी घेतली.
जळगावच्या सुवर्णपेठेत सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,३०० रुपये प्रति तोळा इतका आहे. जीएसटीसह सोने ७८५९० रूपपर्यंत आहे. तर चांदीचा दर ९२००० रुपये प्रति किलो इतका आहे. मात्र आता नवरात्रोत्सवात सोन्याचा दर ८० हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे.
यामुळे आता सणासुदीच्या दिवसात ग्राहकांच्या खिशाला जोरदार कात्री बसणार आहे. सणासुदीसोबतच आता लग्नाचा सीझन येणार असल्याने सराफा बाजारात दिवसागणीक सोन्याच्या किंमती नवनवीन उच्चांकच गाठणार आहे.