जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२४ । दिवाळी आता तोंडावर आली असता त्यापूर्वीच सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड गुंडाळून ठेवले.तर चांदीने मोठी मुसंडी मारली. जळगाव सुवर्णपेठेत गेल्या तीन दिवसात सोने दरात प्रति तोळा १७०० रुपयाची वाढ झाली. यामुळे सोन्याच्या किमतीने प्रथमच ८० हजार रुपयाचा टप्पा गाठला आहे.
दिवाळीत सोन्याचा दर ८० हजार रुपयाचा टप्पा गाठणार असल्याचं अंदाज आधीच जाणकारांनी व्यक्त केला आहे. अखेर तो अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. दिवाळीच्या आठवडाभर अगोदरच सोन्याने हा टप्पा गाठला. ईस्त्राईल-हमास युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत असून युद्धाचा भडका आणखी उडाल्यास दिवाळीत सोने आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोन्याचा दर ८५ हजार रुपयाचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे .
जळगावात काय आहेत सोने चांदीचे भाव?
जळगाव सराफ बाजरात काल शुक्रवारी सोने दरात ९०० रुपयाची वाढ दिसून आली. यामुळे सोने सर्वाधिक उच्चांकी प्रती तोळा ८०३४० (जीएसटीसह) रुपयांवर पोहचले आहेत. तर विनाजीएसटी सोन्याचा दर ७८००० रुपये इतका आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातही एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे चांदीचा दर ९४,००० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
येत्या गुरुवारी २४ तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवशी मुहूर्ताचे सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या दिवशी सोन्याचे दर आणखी वाढण्याचा अंदाज आहे.