जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२५ । सध्या सोने आणि चांदी दरात चढ उतार सुरूच असून आज बुधवारी दोन्ही धातूंच्या दरात आणखी वाढ झाली. विशेषतः चांदीच्या दराने पुन्हा ऐतिहासिक उच्चांक गाठल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली.

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी दिवसभरात पुन्हा १३३९ रूपयांची घट झाल्याने सोने तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३६ हजार १६६ रूपयांपर्यंत खाली आले होते. मात्र आज बुधवारी सकाळच्या सत्रात ४१२ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३६ हजार ५७८ रूपयांपर्यंत वधारले.

दुसरीकडे चांदी दरात मंगळवारी दिवसभरात २०६० रूपयांची घट नोंदवली गेल्याने चांदी जीएसटीसह एक लाख ९८ हजार ७९० रूपयांपर्यंत खाली आली होती. तर आज तब्बल ७२१० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीने जीएसटीसह प्रति किलो दोन लाख सहा हजार रूपयांच्या ऐतिहासिक उच्चांकापर्यंत मजल मारली.

लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी आधीच मजबूत आहे. त्यातच जागतिक बाजारातून मिळणाऱ्या सकारात्मक संकेतांमुळे सोन्याचे दर आणखी मजबूत होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच पुढील वर्षात अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदरात आणखी कपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्याजदर कपातीच्या अपेक्षेमुळे अमेरिकी डॉलरवर दबाव येताना दिसत आहे. डॉलर कमकुवत झाल्यास सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांचे आकर्षण वाढते. याचा थेट फायदा सोन्याच्या किमतींना होत असून, सोन्याचे दर वरच्या दिशेने सरकत आहेत.









