जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२५ । सोन्यासह चांदी दरात चढ उतार सुरूच आहे. जळगाव च्या सुवर्णनगरीत सोमवारी (दि १२) घसरण झालेल्या सोने-चांदीच्या भावात मंगळवारी (१३ मे) पुन्हा वाढ झाली. भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारल्याने सोने-चांदीत भाववाढ झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आज सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोने एक हजार ५०० रुपयांनी वधारून ९४ हजार ७०० (जीएसटीसह ९७,५४१) रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे चांदीचा दर तब्बल तीन हजार ९०० रुपयांनी वाढून ९८००० रुपयावर पोहोचली. तर जीएसटीसह १ लाखावर गेली.
गेल्या अनेक दिवसांपासून भाववाढ होत गेलेल्या सोने-चांदीच्या भावात सोमवारी मोठी घसरण झाली होती. सोने तीन हजार ६०० रुपयांनी कमी होऊन ९३ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर आले होते. तसेच चांदीही दोन हजार ४०० रुपयांनी कमी होऊन ९४ हजार १०० रुपयांवर आली होती. त्यानंतर मात्र दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (१३ मे) सकाळी सोने भावात एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते ९४ हजार ५०० रुपये झाले. दुपारी त्यात पुन्हा २०० रुपयांची वाढ झाली व सोने ९४ हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर पोचले.
दुसरीकडे चांदीत सकाळी तीन हजार १०० रुपयांची वाढ झाली व दुपारी पुन्हा ८०० रुपयांची वाढ झाल्याने चांदी ९८ हजार रुपये प्रतिकिलोवर पोचली. मंगळवारी अमेरिकन डॉलरचे दर वाढून ८५.३० रुपयांवर पोचले. त्यामुळे सोने-चांदीचे भाव वाढले