जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२५ । जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे बदली झाली आहे. त्यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली आहे.

संभाजीनगरातील विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपरिषद प्रशासन संचालनालय विभागात अधिक्षक अभियंता म्हणून त्यांची निवड झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोनवणे यांच्या गैरकारभाराबाबत तक्रारी करण्यात येत होत्या. या अनुषंगाने आज अखेर त्यांची बदली झाली.
याबाबतचे आदेश आज महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव द. व. खारके यांनी काढले आहेत. यात त्यांनी आपल्या नवीन पदाचा कार्यभार हा तात्काळ सांभाळावा असे नमूद करण्यात आले आहे.
तत्कालीन अधिक्षक अभियंता रूपाली राऊळ-गिरासे असतांना प्रशांत सोनवणे यांच्याकडे अधिक्षक अभियंतापदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यानंतर त्यांच्याकडे या पदाचा अधिकृत कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यांच्या कार्यकाळात अनेक कामांमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. यानंतर त्यांची आता बदली करण्यात आली आहे. दरम्यान, बदली होऊन देखील राजकीय वरदहस्तामुळे त्यांच्याकडे जळगाव अधिक्षक अभियंतापदाचा कार्यभार राहणार की येथे नवीन अधिकारी येणार ? याबाबत आता चर्चेला उधाण आले आहे.